‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत होणार महाराष्ट्राचे राज्यगीत, मंत्री मुनगंटीवारांची घोषणा

मुंबई, १९ ऑक्टोबर २०२२ : जय जय महाराष्ट्र माझा, हे गीत कवी राजा बढे यांनी लिहिले असून श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले. तर, महाराष्ट्राचे प्रतिभावंत शाहीर कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे. शाहीर साबळे यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे प्रदर्शन होईल. या गीताची लांबी जास्त असल्यामुळे या गीतामधील फक्त पहिली दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्यावर तज्ञांचे एकमत झाले आहे.

हे गीत राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गीत असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्र राज्याचाही समावेश होईल.

शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गाणं प्रदर्शित होणार आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य सरकार राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्राचे अधिकृत राज्य गीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा