पुणे, २० ऑक्टोबर २०२२ : सारथीच्या धर्तीवर शासनाकडून महाज्योती संस्थेला निधी देण्यात यावा म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बुधवारी पुण्यातील शास्त्री रस्ता येथे आंदोलन केले. अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर केलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे घोषणाबाजी केली.
सध्या परिस्थितीत केंद्र सरकारकडून केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत मिळते. तर, आम्हाला मदत का नाही? असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला. एमपीएससी परीक्षेसाठी आम्हाला निधी न देऊन आमच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
महाज्योतीच्या पुण्यातील युपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांना सारथी किंवा बार्टी प्रमाणे १८ हजार रुपये आकस्मित निधी मिळाला पाहिजे. हा निधी दिवाळीच्या अगोदर विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे अशी मागणी महाज्योतीचा विद्यार्थी मनोज पिंगळे याने केली आहे.
महाज्योती संस्थेने एमपीएस्सीसाठी केवळ एकच संस्थेची निवड केली आहे. पुण्यातील खासगी क्लासेस असलेली ज्ञानदीप अॅकॅडमी ही ती संस्था आहे. युपीएससीच्या धर्तीवर तीन संस्था निवडण्याची गरज आहे. आंदोलक विद्यार्थी म्हणाले की, एमपीएससीच्या एका मुलासाठी महाज्योती एक लाख २५ हजार रुपये ज्ञानदीप संस्थेला देणार आहे.
यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार असून त्याची साखळी लांब पर्यंत आहे. वास्तविक पाहता पुण्यातील नामांकित एमपीएस्सी क्लासची फी ही ६० हजार रुपये असताना एवढे पैसे हे खाजगी क्लासला फुकट देण्याचे कारण काय? याबाबत खुलासा करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अशा प्रकारे संघर्ष करावा लागणार असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास कधी करायचा आणि अपेक्षित ध्येय कसे गाठायचे. असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर