दिवाळी पहाट: गायक सूरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

पुणे, २४ ऑक्टोबर २०२२ : बालगंधर्व रंगमंदिरात ‘स्वर सुरांची आनंदयात्रा’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक धन्यकुमार दर्डा यांनी केले होते. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गायनाने रसिकांना रविवारी भक्ती आणि प्रेमरसाची अनुभूती आली. कार्यक्रमाची सुरुवात सुरेश वाडकर यांनी ॐकार स्वरूपा या भक्तीगीताने केली. ‘देवाचिये द्वारी’, ‘काळ देहासी आला’, ‘श्रीमद्‌‍ नारायण नारायण’ या गीतात रसिक रममाण झाले.

रसिकांशी संवाद साधत अनुराधा पौडवाल यांनी ‘ओम जय जगदीश हरे’ ही आरती सादर करतानाच उपस्थितांना टाळ्यांच्या ठेक्यावर ताल धरायला लावला. ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ हा तारकमंत्र, ‘स्वामी समर्थ माझे आई’, ‘आरती साईबाबा’, ‘अच्युतम्‌‍ केशवम्‌‍ कृष्ण दामोदरम्‌‍’ या रचना सादर करून रसिकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. भक्ती रसाबरोबरच रसिकांना प्रेमरसाची अनुभूती देताना ‘लगी आज सावनी की’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘ओ प्रिया प्रिया’, ‘एक प्यार का नगमा है’, ‘धीरे धीरे से मेरे जिंदगीमे आना’, ‘नजर के सामने’, ‘जिये तो जिये कैसे’, ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’, ‘राजा ललकारी अशी दे’, ‘काळ्या मातीत मातीत तिफण चालते’ ही हिंदी-मराठी चित्रपट गीते सादर केली.

गायक-संगीतकार चंद्रशेखर महामुनी, सचिन इंगळे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन स्नेहल दामले, योगेश सुपेकर यांनी केले.कलाकारांचे स्वागत धन्यकुमार दर्डा आणि संगीता दर्डा यांनी केले.

वाडकर आणि पौडवाल यांना अनेक वर्षांनंतर प्रत्यक्ष ऐकायला मिळणार असल्याने नाट्यगृह खचाखच भरले होते. कार्यक्रमाचे निमित्त होते रौप्यमहोत्सवात पदार्पण करणाऱ्या महावीर एंटरप्रायझेस आयोजित स्वर सुरांची आनंदयात्रा या कार्यक्रमाचे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा