मुंबई, २४ ऑक्टोंबर २०२२: राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे दौरा केला त्यांनी ओल्या दुष्काळाचीही पाहणीही केली.
घोषणांची अतिवृष्टी करणारे निर्दयी सरकार भावनाशून्य तर आहेच पण उत्सवीही आहे, अशी टीका करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या हेक्टरी ५० हजार रुपये मदत मागणीच्या पाठिशी शिवसेना उभी राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून आता सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले आहे. कोकणातील अनेक घरं वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेंव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत नाहीत. त्यामुळे त्यांना करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात अशी खोचक टीका लक्षण ढोबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
एकीकडे शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी बाधांवर पोहोचलोय म्हणतात, दुसरीकडे १५ ते २० मिनिटांमध्ये दौरा आवरता घेतात. अडीच वर्ष सत्ता असताना एकही चांगलं काम करावं, असं त्यांना वाटलं नाही. आज शिंदे फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. मात्र, हे त्यांना बघवत नाही, असेही लक्षण ढोबळे म्हणाले.
राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप हे तर नेहमीच चालणार आहेत, पण महागाई बेरोजगारी आर्थिक मंदीचे सावट बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे