श्रीनगर, २६ ऑक्टोबर २०२२: उत्तर कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्याचा घुसखोरीचा कट उधळून लावला. तंगधारच्या सुदपोरा भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणार्या एका परदेशी दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी ठार केले आहे. ठार झालेल्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडा पोलिसांनी उत्तर काश्मीरमधील तंगधार भागात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्ससह संयुक्त कारवाई केली. ऑपरेशन दरम्यान, एक दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत असताना त्याला कंठस्नान घालण्यात आले.ओळखपत्रावरून तो पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे. मृत दहशतवाद्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, ग्रेनेड्स आणि पाकिस्तानी चलनांसह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यापूर्वी दहशतवादी इम्रान बशीर गनी याचा जम्मू-काश्मीरमधील नौगाम येथील शोपियानमध्ये खात्मा करण्यात आला होता. तो संकरित दहशतवादी होता आणि दुसऱ्या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक