झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स; उद्या चौकशी होणार

47

नवी दिल्ली, २ नोव्हेंबर २०२२: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) हेमंत सोरेन यांना अवैध खाण काम प्रकरणात समन्स बजावलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांना उद्या सकाळी ११ वाजता रांची येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. खरेतर, खाण प्रकरणातील आरोपी आणि हेमंत सोरेन यांचे जवळचे असणारे पंकज मिश्रा यांच्या घरावर छापा टाकताना ईडीला अलीकडंच सीएम हेमंत सोरेन यांचं बँक पासबुक आणि स्वाक्षरी असलेलं चेकबुक सापडलं होतं. त्यानंतर आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांनाच समन्स बजावलंय.

काय आहे नेमकं प्रकरण ?

झारखंडमधील कथित खाण घोटाळ्यात ईडी मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे. पंकज मिश्रा यांना ईडीने १९ जुलै रोजी पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती. मिश्राशिवाय बच्चू यादव आणि प्रेम प्रकाश यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलंय. दोघांना ४ आणि ५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं २४ ऑगस्ट रोजी प्रेम प्रकाशच्या घरावर छापा टाकला होता. दरम्यान, ईडीला झारखंड पोलिसांच्या दोन एके-४७ रायफलही मिळाल्यात.

ईडीनं यापूर्वी हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा, दाहू यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ३७ बँक खात्यांमधील ११.८८ कोटी रुपये पीएमएलए कायदा, २००२ अंतर्गत जप्त केले होते. यापूर्वी ईडीने साहिबगंज, बरहैत, राजमहल, मिर्झा चौकी आणि बरहरवा येथे १९ ठिकाणी छापेमारी केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना ईडीनं समन्स बजावल्याचं वृत्त समोर येताच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यात.

निशिकांत दुबे यांचं ट्विट:

गोड्डा येथील लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांनी या बातमीशी संबंधित वृत्तपत्राचे कटिंग शेअर करताना लिहिलं की, आता काय उरलं आहे?

तर भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनीही ट्विट केलंय. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, भगवान श्रीकृष्णानं अहंकारी शिशुपालच्या शंभर चुका माफ केल्या होत्या. आणि नियतीचा हाच नियम आहे, जेव्हा पापाचा घडा पूर्ण भरला जातो, तेव्हा नियतीचं चक्र चालूच राहतं. याकडे मुख्यमंत्र्यांना टोमणे मारल्यासारखे पाहिलं जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.