मुंबई, २ नोव्हेंबर २०२२ : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तसेच या यात्रे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सामील होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिलीय.
काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली असून आज ५६ वा दिवस आहे. तरी ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेडच्या देगलूरहून ही भारत जोडो यात्रा सुरु होणार आहे. दरम्यान भारत जोडो यात्रे मध्ये ९ नोव्हेंबरला शरद पवार नांदेडमधील नायगावमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच यात्रेत शरद पवार यांच्यासह जयंत पाटील देखील सहभागी होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिलीय. दरम्यान या यात्रेसंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, रोहित पवार यांना या यात्रेचं निमंत्रण देण्यात आलं असून तेही यात सहभागी होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिलीय.
तसंच अशोक चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेसाठी नवीन घोषणाही तयार केलीय. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत नागरिकांमध्ये असलेली कमालीची उत्सुकता व आकर्षण पाहता #मीपणचालणार हे घोषवाक्य केलं असून, त्याची घोषणा आज नांदेड येथे करण्यात आली. असे अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा ३८२ किलोमीटरचा प्रवास करत पाच जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामध्ये नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांचा समावेश आहेत. महाराष्ट्र राज्यातील भारत जोडो यात्रेचा समारोप शेगाव येथे जाहीर सभेनं होणार आहे. शहरातील काही काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण १६ दिवस राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत चालणार आहेत. तर या यात्रेमध्ये फक्त काँग्रेस कार्यकर्तेच नाही, तर इतर कुठल्याही व्यक्तीला किंवा संघटनेला सहभागी होता येणार आहे.
महाराष्ट्राचे वेळापत्रक
भारत जोडो’ पदयात्रेचे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन होईल. ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान ही पदयात्रा नांदेडमध्ये असेल. यादरम्यान चार ठिकाणी या यात्रेचे मुक्काम असेल. ११ ते १५ नोव्हेंबर ही यात्रेचा हिंगोतील आगमन होईल. तर १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान वाशिम, १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अकोला आणि १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान बुलढाण्यातून ही यात्रा जाणार आहे. तसेच नांदेड आणि शेगाव येथे राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे