गुजरात, २६ नोव्हेंबर २०२२ गुजरातमध्ये तीन दशकापासून राज्य करणार्या भारतीय जनता पक्षाने शनिवारी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना डोळ्यासमोर ठेवून चाळीस आश्वासने दिली आहेत. यामध्ये येणार्या पाच वर्षात २० लाख तरुणांना रोजगार, २ एम्स स्तरावरील संस्थांची स्थापना आणि १० लाखांचा आरोग्य विमा यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज गांधीनगर येथील प्रदेश कार्यालयात हे ठराव पत्र जारी केले. जेपी नड्डा म्हणाले, ‘गुजरात ही संतांची भूमी आहे. भाजप सरकार जे सांगते तेच करते. आम्ही संविधानाचे पालन करत असतो. आम्ही भेदभाव न करता सर्वांच्या हिताचा विचार करतो. त्यामुळे आमच्या या संकल्प पत्राने गुजरातचा नक्की विकास होईल.
भाजपने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने :
- पुढील ५ वर्षात गुजरातमधील तरुणांना २० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार
- आयुष्मान भारत योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आता १० लाख करण्यात येणार आहे.
- विद्यार्थ्यांना मोफत इलेक्ट्रिक स्कुटी उपलब्ध करून देणार.
- ३ सिव्हिल मेडिसिटी, २ AIIMS स्तरावरील संस्था, विद्यमान रुग्णालये, CHC आणि PHC च्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी १०,००० कोटी रुपयांचा महाराजा श्री भागवत सिंह स्वास्थ्य कोष तयार केला जाणार आहे.
- दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये २ सी फूड पार्क उभारणार
- समान नागरी संहिता समितीच्या शिफारशी लागू करणार.
- २५ हजार कोटी रुपये खर्चून सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत ‘सिंचन योजना’ पुढे नेणार.
- भारतविरोधी शक्तींचा सामना करण्यासाठी आणि संभाव्य धोके ओळखून त्यांचा नायनाट करण्यासाठी कट्टरताविरोधी सेल तयार केला जाईल.
- दहशतवादी संघटनांच्या स्लीपर सेलची ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्री मोफत निदान योजनेंतर्गत, दोन संस्था तयार केल्या जातील, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सर्व प्रकारचे निदान मोफत केले जाईल.
- गोशाळा सुधारण्यासाठी ५ हजार कोटी देणार.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.