पुणे, २७ नोव्हेंबर २०२२ : महाराष्ट्र केसरी ही कुस्तीमधील मोठी मानाची स्पर्धा मानली जाते. राज्यभरातील कुस्ती शौकिनांचे या स्पर्धेकडे विशेष लक्ष असते. यावर्षी संजय कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेईल, असे भारतीय कुस्ती महासंघाचे बी. एन. प्रसूद यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. पुण्यातील तडस गटाकडून होणारी ही स्पर्धा अस्थायी समिती घेणार आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या स्पर्धेची निवड चाचणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे पुण्यातील स्पर्धेचे आयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे याआधीच्या महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी स्वागत केले आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुस्ती परिषदेची बैठक झाली. या बैठकीत रामदास तडस आणि काका पवार यांच्याकडे कुस्ती परिषदेची सूत्रे देण्यात आली. पुण्यात स्पर्धा व्हावी, अशी सर्व पहिलवानांची इच्छा देखील होती. त्यामुळे शरद पवार यांच्या होकाराने कुस्ती स्पर्धा यावर्षी पुण्यात होणार आहेत.
याआधी प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार की नगरला? महाराष्ट्र केसरी स्पर्धा शरद पवार गट घेणार की रामदास तडस गट? असे अनेक प्रश्न समोर आले होते. अखेर भारतीय कुस्ती महासंघाने त्याची भूमिका स्पष्ट करीत यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे ठिकाण स्पष्ट केले आहे. पुण्यातील स्पर्धेची घोषणा झाल्याने नगरच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे