पुणे-मुंबई एक्‍स्‍प्रेस-वेवर बोरघाटात भीषण अपघात; भरधाव ट्रेलरची टेंपोला धडक, दोन्ही वाहने दरीत

ट्रेलरचालकाचा मृत्यू, तर टेंपोचालक गंभीर जखमी

पुणे, ता. ३० नोव्हेंबर २०२२ : पुणे-मुंबई एक्‍स्‍प्रेस-वेवर अपघातांची मालिका सतत सुरूच आहे. बुधवारी (ता.३०) पहाटे चारच्या दरम्यान वाजता बोरघाटात भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरचा टायर फुटून ट्रेलरने समोरील टेंपोला जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहने शंभर फूट खोल दरीत कोसळली. यातील ट्रेलरचालक ठार झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर पुण्याहून मुंबईकडे ट्रेलर जात होता. यावेळी बोरघाटात भरधाव वेगात असणाऱ्या ट्रेलरचे टायर फुटल्याने ट्रेलरने समोरील टेंपोला जोरदार धडक दिली. यात टेंपो आणि ट्रेलरची केबिन शंभर फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ट्रक आणि कंटेनरमधील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये कांदे आणि घरगुती भांड्यांचं सामान होतं. या सामानालाही अपघातात फटका बसलाय.

या भीषण अपघातात ट्रेलरमधील चालक अजित जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर टेंपोचालक गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलिस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी टेंपोमध्ये आणि ट्रेलरमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस, देवदूत यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल झाले. या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांचं रेस्क्यू करण्यात आलं. तसंच महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात आली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा