मुंबई, १ डिसेंबर २०२२ हॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक जेक फ्लिंट यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मृत्यूच्या काही तासच आधी जेक आणि त्याची पत्नी ब्रेंडा यांनी लग्न केले होते. जेकने पत्नी ब्रेंडाबरोबर सुखी आयुष्याची स्वप्न पाहिली होती. पण आनंदाच्या क्षणांवर काहीच तासात विरजण पडले.
३६ वर्षीय जेक फ्लिंट आणि ब्रेंडा हे २६ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकले होते. त्यांनंतर काही तासांतच जेक फ्लिंट यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जेंक फ्लिंट यांना नातेवाईक व मित्रपरिवाराने श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
- जेकच्या पत्नीची पोस्ट :
‘खरंतर यावेळी आम्ही सोबत बसून लग्नाचे फोटो पहायला पाहिजे होते, मात्र मला माझ्या पतीच्या अंत्यविधीसाठी कपडे निवडावे लागत आहेत. एवlढं दु:ख कोणाच्याच नशिबी येऊ नये. माझं हृदय जेकसोबतच निघून गेलेय. त्याने परत यावे अशी माझी अतोनात इच्छा आहे. मी आणखी सहन करू शकत नाही, मला त्याची गरज आहे’, अशा शब्दांत ब्रेंडाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जेक फ्लिंटचा २०१६ मध्ये ‘आय ॲम नॉट ओके’ हा पहिला म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला होता. व्हॉट्स युअर नेम, लाँग रोड बॅक होम, काऊटाऊन, फायरलाइन यांसारख्या गाण्यांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.