तर मोबाईलबंदीमुळे मुलांच्या हाती पुस्तके येतील

पुणे, ३ डिसेंबर २०२२ : बान्सी (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथे शुक्रवारी (ता. ११ नोव्हेंबर २०२२) झालेल्या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या संमतीने किशोरवयीन मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली. खरोखरच बान्सी ग्रामपंचायतीने स्तुत्य निर्णय घेतला असून, मोबाईलबंदीच्या माध्यमातून मुले निश्चितच ग्रंथालयात जातील. त्यांना वाचनाची गोडी लागेल. त्यातून अभ्यासाचे दृढीकरण होईल.

मोबाईलमुळे किशोरवयीन मुलांचे भावविश्व व्यापले आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालक अनेक क्लृप्त्या योजतात, तरीही मुलं मोबाईलच्या आहारी जात आहेत. पालक आणि एकूणच समाजाच्या या समस्येवर पुसद तालुक्यातील बान्सी गावाने ग्रामसभेच्या अधिकारांचा वापर करीत नामी उपाय शोधून काढला आहे. मोबाईलचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बान्सी ग्रामसभेने १८ वर्षांखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामविकासासोबतच समाजस्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. पुसद तालुक्यातील बान्सी ग्रामसभेचा हा ठरावही आगळावेगळा असला, तरी त्याला मुलं किती प्रतिसाद देतात, याकडे गावचे लक्ष लागले आहे.

किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. कोरोनानंतर ही स्थिती अधिकच भयावह झाली आहे. पुसद तालुक्यातील बान्सी गावात ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत अल्पवयीन मुलांसाठी मोबाईल वापरावर बंदीचा हा ठराव घेण्यात आला. हा ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने घेऊन समाजासमोर एक आदर्श पायंडा पाडल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गहुली गावानजीक बान्सी हे गाव आहे. एकेकाळी गहुली हे आदर्श ग्राम होते. आता बान्सी गावाने मोबाईल बंदीचा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना या मोबाईलमुळे गेम्स, वाईट साईट पाहण्याचे व्यसन लागल्याचे अनुभव ग्रामसभेत गावकऱ्यांनी मांडले. त्यामुळे ग्रामसभेने १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाईल वापरावर बंदीचा निर्णय घेण्यात आला. यापुढे मुलांच्या हाती कोणीही पालक मोबाईल देणार नाही, अशी शपथही गावकऱ्यांनी घेतली. या ठरावाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची ग्वाही गावकऱ्यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपवर वाचनात आलं आणि मन अस्वस्थ झालं. रेल्वेप्रवासात दाराला लटकून प्रवास करताना एकाला आपला जीव गमवावा लागला; पण यापेक्षाही पुढची हद्द म्हणजे त्याला हात, आधार देण्याऐवजी आजची ‘सेल्फीश’ तरुणाई त्याच्या जिवासाठी चालणाऱ्या धडपडीचे मोबाईलवर शूटिंग करीत होती. हीच का ती टेक्नॉलॉजी माणसाच्या जिवावर बेतणारी, माणसाला माणुसकीपासून दूर नेणारी?

आजकाल अशा बऱ्याच घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि त्या याच टेक्नॉलॉजीमुळे आपणापर्यंत पोचतातही; पण प्रश्न एवढाच पडतो, की एखाद्याच्या मदतीसाठी धावण्याऐवजी त्याच्या मोबाईल शूटिंगसाठी लोकं एवढे का धावतात?

मित्रांनो, बदल आणि टेक्नॉलॉजी नक्कीच मानवाच्या जीवनात बदल घडवू शकते; पण हीच टेक्नॉलजी आपल्याला चुकीच्या सवयीचे गुलामसुद्धा बनवू शकते.
अजूनही वेळ गेली नाही. बान्सी गावच्या या स्तुत्य निर्णयाची फक्त चर्चा करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:हून स्मार्टफोन वापराबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे आखून त्याची अंमलबजावणी केल्यास निश्चितच माणूस ‘स्मार्ट’ झालेला पाहायला मिळेल, एवढे मात्र खरे.

असं म्हणतात टेक्नॉलॉजीमुळे जग जवळ आलंय, जगाचे माहिती नाही; पण स्मार्टफोन मात्र सर्वांच्या जवळ आले आहेत. स्मार्टफोन ही प्रत्येकाची त्यातल्या त्यात तरुणाईची मूलभूत गरज होऊन बसली आहे. स्मार्टफोनचा योग्य वापर योग्य वेळी करून आपण ई-मेल, सोशल मीडिया, गुगल सर्च व स्मार्टफोनचा उपयोग कॉम्प्युटर किंवा कामात मदतनीस म्हणून केल्यास ते एक अत्याधुनिक वरदानच म्हणता येईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा