मुंबई, ८ डिसेंबर २०२२ : मुंबई-पुणे मार्गारील सर्व शिवनेरी, शिवशाही, सामान्य आणि अर्ध-लक्झरी राज्य परिवहन (एसटी) बसेसच्या चालकांना एमएसआरटीसी व्यवस्थापनाने बुधवारी सविस्तर नोटीस बजावून एक्स्प्रेस हायवे वरील उजवी लेन न वापरण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच ड्रायव्हर्सने गाडी चालवताना फोनवर बोलू नये, सीटबेल्ट लावावा, ट्रॅफिक चिन्हे/नियमांचे पालन करावे, ई-वे वरील निर्बंध फलकांनुसार वेग नियंत्रित करावा, ई-वे वर कुठेही वाहने उभी करू नयेत आणि ओव्हरस्पीड नसावा अशा सूचनाही संबंधित नोटिशीमध्ये नमूद केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी तसेच चालकांना शिस्त लावण्यासाठी आणि राज्य परिवहन विभागाच्या सहा महिन्यांच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तर ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाल मलकित सिंह म्हणाले की, ट्रक आणि ट्रेलर/कंटेनर वाहन चालकांना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उजव्या लेनपासून दूर राहण्यास सांगितले आहे. यासाठी महामार्गावर यासंबंधी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. तसेच महामार्गावरून जाताना सीटबेल्ट वापरण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विशेष तपासणी मोहीम सुरु
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी ‘विशेष तपासणी मोहिमेबाबत’ माहिती देताना सांगितले की, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस शिस्त लागून अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्याच्या उद्देशाने एक डिसेंबरपासून विशेष तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रत्येक तपासणी पथकाच्या प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच दररोज सकाळी १० वाजता गेल्या २४ तासांत पथकांनी केलेल्या कारवाईचा तपशील अद्ययावत करावा लागणार आहे. चालकांना शिस्त लावणे, वर्तनात बदल आणणे आणि अपघातांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब देखील केला जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे