पुणे, १२ डिसेंबर २०२२ : पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील रिक्षा आज पुन्हा बंद असणार आहेत. दुचाकीवरील प्रवासी वाहतूकीला विरोध दर्शवत रिक्षा संघटनांनी आज रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच, आज ११ वाजता आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही रिक्षाचालकांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यातील रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत बंद पुकारला होता.
पुण्यातील ‘बघतोय रिक्षावाला’ या संघटनेसह अनेक रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल एक लाखाहून अधिक रिक्षाचालक बंदमध्ये सहभागी होणार आहेत. १४ दिवसांचा अल्टिमेटम देऊनही प्रशासनाने मागण्या पूर्ण केल्या नाही. त्यामुळे प्रशासनाने फसवल्याचा आरोप करत रिक्षा चालक संघटना आंदोलनावर ठाम आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याचा फटका इतर रिक्षाचालकांना बसतो. त्यांना भाडं मिळणे कठीण होते. याचा परिणाम त्यांच्या कमाईवर होतो. बाईक टॅक्सी बंद करण्याची मागणी त्यांनी यापूर्वीदेखील केली होती. मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. संपात एकूण १२ रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत.
- आंदोलन करू नका असे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
दरम्यान, रिक्षा संघटनांनी आंदोलनाची हाक देताच जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना १२ डिसेंबरला आंदोलन करु नका, असे आवाहन केले होते. राज्यात बेकायदेशिररित्या आणि विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षाचालकांनी आंदोलन करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.