बेंगळुरू, १३ डिसेंबर २०२२ : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता झिका व्हायरसने सरकारची चिंता वाढवली आहे. पुणे शहरानंतर आता कर्नाटक राज्यामध्ये पहिला झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. कर्नाटकमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिली.
के सुधाकर म्हणाले की, कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाली आहे. तसेच, झिका व्हायरसची लागण झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. पुण्याच्या लॅबमधून मिळालेल्या अहवालात पाच वर्षाच्या चिमुकलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून चिंतेचे कारण नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, झिका व्हायरस बाबतीत सध्या सरकार अलर्ट मोडवर आहे. त्याचबरोबर सर्व खबरदारी देखील घेत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, राज्यात कोणत्याही रुग्णालयात संशयित संसर्गाची प्रकरणं आढळल्यास झिका विषाणू चाचणीसाठी नमुने पाठविण्यास सांगितले आहे.
- झिका व्हायरस कशामुळे होतो ?
झिका व्हायरस हा डेंग्यू पसरवणाऱ्या एडिस जातीच्या डासांमुळेच पसरतो. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं.
- झिकाची लक्षणे :
कोरोना संसर्गाप्रमाणेच झिकाचा संसर्ग झालेल्या अनेकांमध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाही. तर काही जणांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. यामध्ये डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, स्नायूदुखी, डोळे लाल होणे, त्वचेवर रॅशेस येणे आदी लक्षणांचा समावेश आहे. ही लक्षणे दोन ते सात दिवसांपर्यंत दिसू शकतात. अनेकांना लक्षणे दिसत नसल्याने किंवा सौम्य असल्याने संसर्ग झालाय हेच कळत नाही.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.