भोपाळ, १३ डिसेंबर २०२२ ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते, माजी आमदार राजा पटेरिया यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना पन्ना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
काय म्हणाले होते पटेरिया ?
काँग्रेसचे माजी आमदार राज पटेरिया यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल झाली. या व्हिडिओनुसार, राज पटेरिया हे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी भाषणात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. पटेरिया यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रक्रिया संपुष्टात आणतील. मोदी धर्म, जाती, भाषा या मुद्यांच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडतील. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुदायाचे भवितव्य धोक्यात आहे. देशाचे संविधान वाचवायचे असल्यास मोदी यांच्या हत्या करण्यास तयार असले पाहिजे. हत्या म्हणजे, त्यांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काम करा, असे वक्तव्य केले होते.
दरम्यान, भाजप नेत्यांनी पटेरिया यांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे देशभरातून काँग्रेस संपत चालली असल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले असून, या वक्तव्याबाबत काँग्रेसने माफी मागावी अशी मागणीदेखील त्यांनी केली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.