रायपूर, १५ डिसेंबर २०२२ :वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये बुधवारी संध्याकाळी कुणीतरी ट्रेनवर दगडफेक केली. यात ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने यात प्रवाशांना कोणतीही दुखापती झाली नाही.
- चार दिवसांपूर्वीच सुरु झालेली ट्रेन
घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. चार दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या रायपूर विभागांतर्गत दुर्ग आणि भिलाई स्थानकांदरम्यान ट्रेन आली तेव्हा कोणीतरी दगडफेक केली. दगड ई-1 कोचच्या खिडकीवर लागल्याने थोडंफार नुकसान झाले आहे. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन नागपूरहून बिलासपूरकडे येत होती. नागपूरवरून बिलासपूरकडे येण्याची ही सहावी फेरी होती.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काही समाजकंटकांनी ही कृती केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. आरपीएफ अधिक तपास करत आहे. ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपुरात त्याचे लोकार्पण करण्यात आले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.