पुणे, १६ डिसेंबर २०२२ : एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंटचे कारखाने बंद केल्याने सुमारे दहा हजार कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहेत. हिमाचल प्रदेशातील बर्माना येथील एसीसी सिमेंट आणि दरलाघाट येथील अंबुजा यांनी बुधवारी त्यांचे प्लांट बंद केले. दोन्ही कंपन्यांनी कर्मचारी आणि कामगारांना गुरुवारपासून (ता. १५) कामावर न येण्याचे आदेश जारी केले आहेत.
कंपन्यांनी मागणी कमी असल्याचे कारण देत प्लांटला टाळे ठोकले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बर्माना येथील एसीसी प्लांटचे प्रमुख अमिताभ सिंह यांनी आदेश जारी करीत परिस्थिती सुधारेपर्यंत व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना कामावर परत न येण्यास सांगितले आहे; तसेच कर्मचाऱ्यांना पुढील आदेशांची प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. प्लांट बंद होण्याचे कारण वेगळे आहे. सिमेंट प्लांट आणि वाहतूकदार यांच्यामध्ये वाद सुरू आहे. सिमेंट प्लांटचा वाहतूकदारांशी करारासंदर्भात वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणामुळे सिमेंट प्लांट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे अंबुजा सिमेंटच्या पाचही ट्रक युनियनने या प्रश्नाबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बर्माना कारखान्यातील टाळेबंदीचा परिणाम लहान दुकानदारांपासून ते ट्रक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या बर्माना ते स्वारघाटपर्यंतच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर होणार आहे. एसीसी सिमेंटच्या युनिटमध्येही चार हजार ट्रक कार्यरत होते, त्यांच्यावर पोट भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही संकट कोसळले आहे.
दहा हजार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
सध्या सिमेंट कंपन्या आणि वाहतूकदार यांच्यातील समन्वय सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. बर्माना एसीसी सिमेंट उद्योग जिल्ह्याच्या; तसेच राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हिमाचल प्रदेश; तसेच शेजारील सीमावर्ती राज्यांतील मोठ्या संख्येने कुटुंब या सिमेंट प्लांटवर अवलंबून आहेत. त्यामुळे सुमारे दहा हजार छोटे-मोठे कर्मचारी आणि कामगारांसोबत त्यांचे कुटुंब यामुळे संकटात सापडले आहे.
दोन्ही प्लांट अदानी समूहाच्या मालकीचे
एसीसी सिमेंटच्या प्लांटमध्ये ट्रक ड्रायव्हर आणि ऑपरेटर आणि त्यांच्याशी संबंधित मेकॅनिकव्यतिरिक्त ३०० कर्मचारी, तर ९०० कंत्राटी कर्मचारी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एसीसीचे गाग्गल युनिटच्या तोट्यात असल्याची चर्चा सुरू होती. सध्या एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंट हे दोन्ही प्लांट सध्या अदानी समूहाच्या मालकीचे आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील