नाटक पाहत असतानाच ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांनी नाट्यगृहात घेतला अखेरचा श्वास

अमरावती, १६ डिसेंबर २०२२ : रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे अमरावती शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (वय ७८ वर्ष ) यांचे काल रात्री ८ वा. हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे. आयुष्यभर ज्या रंगभुमीची सेवा केली, त्याच रंगभुमीसमोर राजाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. नाटक पाहत असताना त्यांना मृत्यूने कवटाळले. त्यांच्या जाण्याने रंगभूमीवर एक पोकळी निर्माळ झाली आहे.

अमरावतीमध्ये राज्य नाट्य स्पर्धेत प्रयोग बघताना ही घटना घडली. ज्या रंगभूमीवर काम करत आपले आयुष्य झिजवलं, रंगभुमीची सेवा केली, त्याच ठिकाणी नाटक बघताना त्यांना मृत्यू आला. संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील ‘थँक यु मिस्टर ग्लाड’ हे नाटक सुरू असताना अचानक राजाभाऊ मोरे यांना हृदयाचा झटका आला. तेथे उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ झेनिथ हॉस्पिटलमध्ये हालवले. मात्र, हॉस्पिटलमध्ये पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

राजाभाऊ मोरे यांना नाट्य परिषदेच्या वतीने यंदा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य नाटकासाठी वेचले. अमरावती आणि आसपासच्या ग्रामीण भागत नाटक पोहोचवण्यामध्ये, नाट्य चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

  • सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली शोकभावना

राजाभाऊ यांच्या निधनानंतर सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मीचा आधारवड हरपल्याचे दुःख आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून दीर्घकाळ हौशी व प्रायोगिक रंगभूमीची सेवा केली. राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. दीर्घकाळ त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे’, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा