महाविकास आघाडीच्या निषेध मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ संबोधित उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फटकारले

मुंबई, १८ डिसेंबर २०२२ : महाविकास आघाडीच्या त्रिपक्षीय युतीने सत्ताधारी एकनाथ शिंदे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात मुंबईभर निषेध मोर्चा काढला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला, की निषेध मोर्चात सामील होण्यासाठी लोकांना पैसे वाटले गेले तरीही महाविकास आघाडी गर्दी जमवू शकली नाही.

“जे लोक तिथे आले होते, त्यांना ते कशासाठी आले होते ते माहीत नव्हते, कोणता कार्यक्रम आहे ते माहीत नव्हते, ते कोणत्या पक्षाचे होते ते माहीत नव्हते, पैसे वाटले गेले होते. हे सर्व करूनही त्यांना गर्दी जमविता आली नाही. त्यामुळे हे लोक (महाविकास आघाडी) जनतेपासून तुटलेले आहेत, हे सिद्ध झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महापुरुषांच्या नावाने राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या त्रिपक्षीय युतीवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली.

ते फक्त राजकारण करतात, हे जनतेला चांगलेच माहीत आहे. महापुरुषांच्या नावाने केलेले राजकारण जनतेला मान्य नाही, मुंबईत सत्ता कोणाची आहे, हे सिद्ध करण्यासाठी ‘नॅनो मोर्चा’ निघाला, असेही ते म्हणाले. मुंबईकडे निघालेल्या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यातील ज्येष्ठ नेते आणि नवी मुंबई, रायगड, पुणे आदी भागांतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या सभेला संबोधित करण्यासाठी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार ‘सीएसएमटी’ येथे दाखल झाले. राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ नेते जोरदारपणे उत्तरले. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपालांचे वक्तव्य असह्य असल्याचे सांगितले.

”महाराष्ट्रातील जनता श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर महान व्यक्तींच्या विरोधात काहीही बोलले तरी खपवून घेणार नाही. शिंदे सरकारला आमचा संदेश आहे की त्यांनी राज्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये.” दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले, की महाराष्ट्रातून काही मोठे प्रकल्प काढून गुजरातला देण्यात आले आणि भाजपने तेथील निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्रातील जनता त्यांच्या मताने भाजपला मजबूत संदेश देईल. या रॅलीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत आणि ‘राष्ट्रवादी’च्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा समावेश होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा