पुणे, १९ डिसेंबर २०२२: सोन्याच्या दरात सध्या तेजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, सरकारने सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर सार्वभौम गोल्ड बाँड योजना (SGB) २०२२-२३ चा नवीन हप्ता सोमवार, १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रिझर्व्ह बँक सोमवारी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना जारी करणार आहे. सरकारी सुवर्ण रोखे (SGB) २०२२-२३ ची तिसरी मालिका १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत सदस्यत्वासाठी खुली असेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गोल्ड बॉण्ड्सची इश्यू किंमत ५,४०९ रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोन टप्प्यात सरकारी गोल्ड बाँड योजना जारी करेल. डिसेंबर आणि मार्चमध्ये या योजना गुंतवणुकीसाठी खुल्या होतील. या आर्थिक वर्षातील तिसरी मालिका १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, चौथी मालिका २०२३ मध्ये ६ ते १० मार्च दरम्यान सुरू होईल.
अर्थमंत्रालयाने सांगितलं की, गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीचे अर्ज १९ ते २३ डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. पात्र अर्जदारांना २७ डिसेंबर रोजी बाँड जारी केले जातील. गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत ९९९ शुद्धतेच्या सोन्यावर आधारित आहे. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्यांना ५० रुपयांची सूट मिळंल.
सोन्यात गुंतवणुकीसाठी सरकारने गोल्ड मॉनेटायझेशन योजनेअंतर्गत सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केलीय. रिझव्र्ह बँक वेळोवेळी अटी व शर्तींसह सुवर्ण रोखे जारी करत असते. या सुवर्ण रोख्याला सरकारी हमी असते.
सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करण्यासाठी रोख, डिमांड ड्राफ्ट किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट केलं जाऊ शकतं. सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेअंतर्गत, एक ग्रॅम सोनं खरेदी करून गुंतवणूक सुरू करता येते.
कोणत्याही एका आर्थिक वर्षात, सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेत जास्तीत जास्त ४ किलो सोनं खरेदी करता येतं. ही मर्यादा अविभाजित हिंदू कुटुंबे आणि ट्रस्टसाठी २० किलो इतकी निश्चित करण्यात आलीय. रिझर्व्ह बँक हे रोखे सरकारच्या वतीनं जारी करते.
सार्वभौम सुवर्ण रोखे बँका (स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नामांकित पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज जसे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड द्वारे खरेदी केले जाऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे