ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा सवाल
पुणे, ता. १९ डिसेंबर २०२२ : ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केला. त्यावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका पोचत आहे. याबाबत साहित्यिकांची मातृसंस्था असलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील महाराष्ट्र साहित्य परिषदांसह अखिल भारतीय साहित्य महामंडळे गप्प का आहेत, असा सवाल साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केला. याबाबत साहित्य संस्थांनी भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आणि विचार दडपून टाकले जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. साहित्य, कलावंत, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना भेटून आवाज उठविला पाहिजे. साहित्य परिषदांनी साहित्य संमेलने भरविण्यापर्यंत स्वत:ची जबाबदारी समजू नये. याबाबत आवाज का उठवला नाही, असा सवाल करून साहित्य महामंडळांसह आजी-माजी संमेलनाध्यक्षांनाही भूमिका मांडायला भाग पाडू, अशा शब्दांत लक्ष्मीकांत देशमुख यांनी भूमिका मांडत ही लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
शंकर ब्रम्हे समाजविज्ञान ग्रंथालय आणि दक्षिणायन यांच्या वतीने आयोजित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या अनुवादित पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्दच्या निषेधार्थ आणि लेखकांना पाठिंबा देण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. देशमुख बोलत होते. अनुवादिका अनघा लेले, लेखक आनंद करंदीकर आणि दक्षिणायन संस्थेचे संदेश भंडारे आदी यावेळी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील