६३ देशांतील स्पर्धक झाले सहभागी; २१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने जिंकला किताब
लास वेगास, १९ डिसेंबर २०२२ : सरगम कौशल या भारतीय तरुणीने ‘मिसेस वर्ल्ड २०२२’ स्पर्धेत ६३ देशांतील स्पर्धकांना मात देत विजेतेपद पटकावलं. २१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब जिंकला आहे. लास वेगासमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मिसेस वर्ल्ड २०२२’ स्पर्धेत सरगम कौशलने मिळविलेला विजय भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.
सरगम कौशल ही जम्मू-काश्मीरची असून, तिने इंग्रजी लिटरेचरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी ती विशाखापट्ट्णमच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होती; तसेच भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर आदित्य मनोहर शर्मा यांची ती पत्नी आहे. आणि आता तिने ‘मिसेस वर्ल्ड २०२२’चे विजेतेपद मिळविले आहे. सरगम कौशलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या क्षणाची एक झलक शेअर केली आहे. ‘मिसेस वर्ल्ड’ या नावाची घोषणा झाल्यावर सरगमला तिचे नाव ऐकून धक्का बसला आणि अश्रू अनावर झाले.
https://www.instagram.com/reel/CmTI52fIO4z/?igshid=MDM4ZDc5MmU=
‘प्रदीर्घ प्रतीक्षा संपली, २१ वर्षांनंतर आपल्याकडे ताज परत आला आहे’ असे कॅप्शन देत या भावनिक क्षणाची एक झलक तिने शेअर केली आहे. त्याचप्रमाणे तिच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तब्बल २१ वर्षांनंतर भारताने ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब जिंकला. यावर्षी ‘मिसेस वर्ल्ड २०२२’ची जज म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर आदिती गोवित्रीकर या २१ वर्षांपूर्वी २००१ मध्ये ‘मिसेस वर्ल्ड’ झाल्या होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे