फलटण येथे महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात संघर्ष समितीतर्फे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

51

फलटण, २१ डिसेंबर २०२२ : फलटण येथील महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात संघर्ष समिती, फलटण येथे द्वारसभा घेऊन फलटण प्रांत अधिकारी यांना संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही पद्धतीचे खासगीकरण करू नये, याबाबत राज्यकर्त्यांनी वेळीच आवाज उठविणे गरजेचे आहे. याबाबत फलटण उपविभागात कर्मचाऱ्यांमध्ये संयुक्त कृती समितीतर्फे जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर सर्वांनी खासगीकरणाला विरोध करीत फलटणचे प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांना याबाबतचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले. यावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील १६ कोटी जनतेच्या मालकीचा व दोन कोटी ८८ लाख ग्राहकांच्या मालकीचा हा वीज उद्योग जगला पाहिजे. वीज ग्राहकांच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे, याकरिता संघर्ष समितीतर्फे ही लढाई सुरू असून, सुरवातीच्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी द्वारसभा घेऊन लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन वीज कामगार, अभियंते, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये प्रचंड जनजागृती निर्माण केली आहे.

फलटण संघर्ष समितीतर्फे फलटण येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करून महाराष्ट्रामध्ये वीज वसुलीचे काम, वीजचोरी पकडण्याचे काम पूर्णपणे बंद करणार आहे. त्यांनी कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहू नये. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त कोणी कार्यालयात थांबू नये, महानिर्मिती व महापारेषण कंपनीतील कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांनी काळ्या फिती लावून असहकार आंदोलन सुरू ठेवावे. हे आंदोलन वीज ग्राहकांच्या हक्कासाठी असल्याने वीज ग्राहकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, याची आपण काळजी घ्यावी, अशी चर्चाही यावेळी करण्यात आली.

संबंधित संघर्ष समितीचा विरोध लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी या विषयावरती लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत संघर्ष समितीतर्फे मांडण्यात आले आहे.
यावेळी मोठ्या संख्येने अभियंते, आधिकारी, कर्मचारी यांच्यासह संघर्ष समिती फलटणचे पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार