पिंपरी-चिंचवड, २२ डिसेंबर २०२२ : विद्युत रोषणाईच्या माळा, लाल रंगाचे बेल्स, सांताक्लॉजचे छोटे मुखवटे अन् छोटेसे गिफ्ट… ख्रिसमस ट्री सजविण्यासाठीच्या या साहित्यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या ख्रिसमस ट्रीला मोठी मागणी वाढली आहे. ख्रिसमस ट्रीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. कोणी दोन फुटांचे, तर कोणी सहा फुटांचे ख्रिसमस ट्री खरेदी करीत असून, ट्री सजविण्यासाठी लागणार्या वैविध्यपूर्ण साहित्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय म्युझिकल ख्रिसमस ट्री, पांढर्या रंगातील ख्रिसमस ट्री, एलईडी लाईट्सने सजलेला ख्रिसमस ट्री… अशा विविध प्रकारचे ट्री खरेदी केले जात आहेत.
ख्रिसमसच्या सणाला अवघे तीन दिवस उरले असून, ख्रिश्चन समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. समाजबांधवांकडून ख्रिसमस ट्रीच्या खरेदीलाही सुरवातच झाली असून, ट्री सजविण्यासाठी लागणार्या साहित्यांचीही खरेदी होत आहे. ट्री सजविण्यासाठी लागणारे बेल्स, छोटे गिफ्टस्, सांताक्लॉजचे मुखवटे, सांताक्लॉजची लाल रंगातील शिदोरी, टोपी, लाल रंगातील फुगे आणि लाल रंगाचे छोटे वॉल हँगिंग असे विविध प्रकारचे साहित्य दालनांमध्ये उपलब्ध आहेत. एक ते दहा फुटांपर्यंतच्या ट्रीला मागणी आहे. तर, लहान आकारातील छोटे ख्रिसमस ट्री भेट देण्यासाठी खरेदी केले जात आहेत. सध्या दालने ट्रीने आणि त्यावरील विद्युत रोषणाईने झगमगली आहेत. १२५ रुपयांच्या छोट्याशा ट्रीपासून ते साडेतीन ते चार हजार रुपयांच्या मोठ्या आकारातील ट्रीची खरेदी जोमाने सुरू आहे.
देहूरोड, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी बाजारपेठ, भोसरी अशा पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या बाजारपेठेतील दालनांमध्ये ट्री खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ट्रीच्या सजावटीसाठीच्या विविध रंगांतील झिरमिळ्या, विद्युत रोषणाईच्या माळा, लाइट्स हेही खरेदी केले जात आहेत. यंदा ट्रीच्या किमतींतही वाढ झाली असून, हिरव्या रंगातील ख्रिसमस ट्रीला सर्वाधिक मागणी आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील