सिक्कीम, २४ डिसेंबर २०२२: सिक्कीममध्ये एक मोठा रस्ता अपघात झालाय. येथे शुक्रवारी एक बस खोल दरीत कोसळून १६ लष्करी जवानांचा मृत्यू झाला. घटनास्थळी गर्दी जमली आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. उत्तर सिक्कीममधील लाचेनपासून १५ किमी अंतरावर गेमा भागात हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेनं निघाला होता. गेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण अचानक सुटलं आणि वाहन खाली दरीत कोसळलं.
माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केलं. ४ जखमी जवानांना वाचवून बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ सैनिकांचा मृत्यू झाला.
भारतीय लष्करानं या दुर्घटनेवर एक निवेदन जारी केलं असून या दु:खाच्या प्रसंगी ते शोकाकुल कुटुंबियांसोबत उभे असल्याचं म्हटलंय. कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. लष्कराच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या अपघातात लष्कराचे वाहन हे चाटेनहून थंगूच्या दिशेनं जाणाऱ्या तीन वाहनांच्या ताफ्यातील होते. घटनास्थळी बचावकार्य करण्यात आलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे