पुणे, २५ डिसेंबर २०२२: कोरोना व्हायरसनं चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. २० दिवसांत येथे २५ कोटी (२५० मिलियन) लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत यावरून याचा अंदाज लावता येतो. सरकारी कागदपत्रं लीक झाल्यानंतर ही बाब उघड झालीय. रेडिओ फ्री एशियाने सोशल मीडियावर फिरत असलेल्या कागदपत्रांचा हवाला देत म्हटलंय- महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘झिरो-कोविड पॉलिसी’ शिथिल केल्यानंतर परिस्थिती गंभीर बनलीय आणि अवघ्या २० दिवसांत चीनमध्ये सुमारे २५० मिलियन लोक संक्रमित आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बैठकीत संसर्गाशी संबंधित डेटा सादर करण्यात आला. ही बैठक केवळ २० मिनिटं चालली आणि आता त्याची कागदपत्रं लीक झाली आहेत. आकडेवारीनुसार, १ ते २० डिसेंबर दरम्यान, २४८ दशलक्ष लोकांना कोविड-१९ ची लागण झाली, जी चीनच्या लोकसंख्येच्या १९.६५ टक्के आहे. रेडिओ फ्री एशियानुसार, २० डिसेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या कोविड प्रकरणांची आकडेवारी वास्तवापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तेव्हा सरकारनं फक्त ३७ मिलियन (३.७ करोड) अंदाज लावला होता.
रोज होणार ५ हजारांहून अधिक मृत्यू!
एका वरिष्ठ चिनी पत्रकारानं गुरुवारी रेडिओ फ्री एशियाला सांगितलं की व्हायरल झालेली कागदपत्रं खरी आहेत आणि बैठकीत सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्यानं ती लीक केली होती, ज्यानं जाणीवपूर्वक वस्तुस्थिती सार्वजनिक हितासाठी पसरवण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी शनिवारी चीनच्या आरोग्य विभागानं ३,७६१ नवीन प्रकरणांची पुष्टी केली होती. तथापि, नवीन मृत्यूची नोंद झाली नाही. हा अहवाल अशा वेळी आलाय जेव्हा एअरफिनिटी या ब्रिटिश-आधारित आरोग्य डेटा फर्मने दावा केलाय की चीनमध्ये दररोज ५,००० हून अधिक मृत्यू होत आहेत आणि एका दिवसात १० लाखांहून अधिक संक्रमित आढळले आहेत.
चीनमध्ये जानेवारीमध्ये कोरोना शिगेला पोहोचणार
एअरफिनिटीचे नवीन मॉडेलिंग चीनमधील प्रादेशिक प्रांतांमधील डेटाचे परीक्षण करते. सध्याचा उद्रेक इतरांपेक्षा काही भागात अधिक वेगाने वाढत आहे. बीजिंग आणि ग्वांगडोंगमध्ये प्रकरणं वेगानं वाढतायत. एअरफिनिटी मॉडेलने असा अंदाज वर्तवला आहे की, प्रकरणांची सकारात्मकता दर जानेवारीमध्ये शिखरावर जाईल. २०२३ जानेवारीमध्ये मध्ये दररोज ३.७ मिलियन आणि मार्चमध्ये दररोज ४.२ मिलियनपर्यंत पोहोचेल.
वाढतेय मृतांची संख्या
एअरफिनिटीचे लस आणि महामारीविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. लुईस ब्लेअर म्हणाले- चीनने मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेणं थांबवलंय आणि आता लक्षणे नसलेल्या प्रकरणांची नोंद केली जात नाही. चीननं कोविड-१९ मुळं होणाऱ्या मृत्यूची नोंद करण्याची पद्धतही बदलली आहे. केवळ अशा लोकांचा समावेश केला जात आहे ज्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आणि श्वासोच्छवास किंवा न्यूमोनियामुळं मृत्यू झाला.
ही पद्धत इतर देशांपेक्षा वेगळी आहे जिथं मृत्यू सकारात्मक चाचणीच्या कालावधीत नोंदवले जातात किंवा जिथे मृत्यूचं कारण COVID-19 असल्याचं मानलं जातं. असा विश्वास आहे की चीनची ही वेगळी पद्धत देशातील मृत्यूची संख्या कमी करण्यास उपयुक्त ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे