नवी दिल्ली, २५ डिसेंबर २०२२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रविवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सदैव अटल स्मृतिस्थळावर पुष्पांजली वाहिली.
”अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. भारतासाठी त्यांचे योगदान अमिट आहे. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी लाखो लोकांना प्रेरित करते,” असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले. वाजपेयींनी १६ मे १९९६ ते १ जून १९९६ आणि पुन्हा १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांनी १९७७ ते १९७९ पर्यंत पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री म्हणूनही काम केले होते. १६ ऑगस्ट २०१८ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिवंगत पंतप्रधानांना श्रद्धांजली अर्पण केली. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान आणि भारतरत्न प्राप्तकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड