औरंगाबादमध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण; आरोग्य विभाग अलर्ट

औरंगाबाद, २५ डिसेंबर २०२२ : चीनमध्ये कोरोनाचे थैमान पाहता राज्यासह देशभरातील आरोग्य विभाग अलर्ट झाले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात देखील कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात येत आहेत. दरम्यान, वाळूज महानगरमधील बजाजनगरातील सिडकोत कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्याचा आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी पाठविला आहे. तर खासगी डॉक्टरांच्या मार्गदर्शनात या रुग्णाला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परीक्षेसाठी खानदेशातून एक विद्यार्थी शहरात आला होता. दरम्यान, त्याची अँटीजेन चाचणी करण्यात आली असता, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर गंभीर लक्षण नसल्याने त्याला त्याच्या राहत्या खोलीमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.

आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्या
गेल्या काही दिवसांपासून चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सुदैवाने एकही रुग्ण सक्रिय नव्हत; मात्र आता वाळूज भागात जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळून आला असल्याने आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला आहे; तसेच आता खबरदारीचा उपाय म्हणून मनपाच्या ४१ आरोग्य केंद्रांत कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील चाचण्या वाढविणार…
चीनमध्ये कोरोनाचे थैमान पाहता आता राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. याचवेळी औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. तर जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या तालुकास्तरावर २० ते २५ चाचण्या होत असून, त्या असमाधानकारक असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. तर यापुढे सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने, युनानी दवाखाने, फिरते आरोग्य पथक यांना दिवसभरात ५० अँटीजेन, आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आदेश औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके यांनी दिले आहेत.

औरंगाबादकरांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाले असतानाच, दुसरीकडे मात्र औरंगाबादकरांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यासाठी आलेल्या लसी तशाच पडून आहेत. तर आता यातील ५६ हजार कोव्हॅक्सिनचे डोस ३१ डिसेंबरनंतर एक्स्पायर होणार आहेत. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ३० लाख ५६ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, २४ लाख १ हजार ५३२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर फक्त २ लाख ७१ हजार नागरिकांनीच बुस्टर डोस घेतला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा