पुणे, ता. २८ डिसेंबर २०२२ : अखेर ‘बीसीसीआय’ने ट्वेंटी-२० विश्वकरंडकाच्या पराभवानंतर नव्या दमाचा ट्वेंटी-२० संघ तयार करण्यास सुरवात केली. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याच्या हातात देण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुलसह ऋषभ पंतचाही ट्वेंटी-२० संघातून पत्ता कट झाला आहे.
आशिया करंडकानंतर ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्येही भारताच्या पदरी निराशा पडली होती. त्याचवेळी भारतीय ट्वेंटी- संघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ‘बीसीसीआय’ने कंबर कसली. अखेर आज श्रीलंका मालिकेपूर्वी ‘बीसीसीआय’ने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपविले. जरी ‘बीसीसीआय’ने रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुल या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असल्याचे कारण दिले असले, तरी ही विश्रांती सक्तीची असून, जवळपास या वरिष्ठ खेळाडूंची ट्वेंटी-२० संघातून अघोषित घरवापसी झाली आहे.
दुसरीकडे ट्वेंटी-२० आणि वनडे संघातून ऋषभ पंतचाही पत्ता कट झाला असून, त्याच्या जागी आता संजू सॅमसन आणि इशांत किशन यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका वर्षापूर्वीच भारतीय संघात पादर्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला भारतीय ट्वेंटी-२०
संघाचे उपकर्णधारपद देऊन त्याच्या कामगिरीचा एकप्रकारे ‘बीसीसीआय’ने गौरवच केला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील