पुणे, ३१ डिसेंबर २०२२ : पिशोर (जि. औरंगाबाद) येथील महात्मा ज्योतिबा फुले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. संजय गायकवाड यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमांई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. डॉ. गायकवाड हे २४ वर्षांपासून इंग्लिश विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत. लेखन आणि व्याख्यान हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे दोन महत्वाचे पैलू आहेत. एक उपक्रमशील तथा नवोपक्रमशील शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर त्यांनी विविध प्रशिक्षणात साधन व्यक्ती म्हणून काम केलेले आहे. इयत्ता बारावीचा शंभर टक्के अभ्यासक्रम त्यांनी ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे. ‘द स्मार्ट इंग्लिश’ ॲपच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपयोगी असे कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. कोविड-१९ महामारीच्या काळात ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणप्रक्रियेला वेग दिलेला आहे. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकांचे लेखन केले असून, समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक अनेक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना माध्यमिक विभागातून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणगौरव पुरस्कार जाहीर केला आहे.
मुंबई येथे या पुरस्काराचे मान्यवरांच्या शुभहस्ते वितरण केले जाणार आहे. या पुरस्काराच्या घोषणेमुळे त्यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील