नवी दिल्ली, १ जानेवारी २०२३ : आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. नववर्षासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी १ जानेवारी २०२३ पासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. परंतू व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिन्याच्या पहिल्याच तारखेला सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने, या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत आजपासून व्यावसायिक सिलिंडर १,७६९ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत १,७२१ रुपये, कोलकात्यात १,८७० रुपये आणि चेन्नईमध्ये एका सिलिंडरसाठी १,९१७ रुपये मोजावे लागणार आहेत.
- ६ जुलै २०२२ रोजी झालेली ५० रुपयांची वाढ
घरगुती सिलिंडरच्याबाबतीत बोलायचे झाले तर त्यात ६ जुलै २०२२ रोजी इंधन कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केली होती. गेल्या एका वर्षात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत १५३.५० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या राजधानी दिल्लीत घरगुती सिलिंडर १,०५३ रुपयांना मिळत आहे. तर मुंबईत १०५२.५ रुपये, कोलकात्यात १,०७९ रुपये आणि चेन्नईमध्ये एका सिलिंडरसाठी १०६८.५ रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, २०२२ मध्ये, घरगुती एलपीजीच्या किंमतीत चार वेळा बदल झाला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.