‘राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधीकरण’मध्ये गूगल कंपनी देणार उत्तर
पुणे, ४ जानेवारी २०२३ : ‘गूगल’वर अँड्रॉईड मोबाईल इकोसिस्टीममधील उल्लंघनाचा आरोप आहे, ज्यामुळे भारतीय स्पर्धा आयोगाने १३३७ कोटींचा दंड ठोठावला आह. याप्रकरणी ‘गूगल’ने नॅशनल कंपनी लॉ अपील ट्रिब्युनलशी संपर्क साधला आहे. आज राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधीकरणमध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलोक श्रीवास्तव (तांत्रिक सदस्य) आणि राकेश कुमार (न्यायमूर्ती) आज ‘एनसीएलएटी’मध्ये या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतीय स्पर्धा आयोगाने ‘गूगल’वर १ हजार ३३७ कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला होता. कंपनीने अँड्रॉईड मोबाईल इकोसिस्टीममधील मजबूत स्थानाचा गैरवापर केला होता. याशिवाय, ‘सीसीआय’ने सर्च इंजिन ‘गूगल’ला त्यांचे अनुचित व्यावसायिक क्रियाकलाप थांबविण्याचे निर्देश दिले होते. इतकेच नाही तर ‘सीसीआय:ने कंपनीला ‘गूगल’च्या कामाच्या पद्धतीत बदल करण्याची मुदतही दिली होती.
एप्रिल २०१९ मध्ये अँड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींनंतर ‘सीसीआय’ने चौकशीचे आदेश दिले होते. दोन वर्षे चाललेल्या या तपासणीत ‘सीसीआय’ला असे आढळून आले, की ‘गूगल’ने ब्राऊझर, सर्च, लायब्ररी आणि इतर प्रमुख सेवांमध्ये आपले वर्चस्व राखण्यासाठी अनेक गोष्टींचे उल्लंघन केले आहे. मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, गूगल कंपनी ॲप बनविणाऱ्यांवरही एकतर्फी करार करीत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड