मुंबई: आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा ‘रफ अँड टफ’ लूक समोर आला आहे.
मोहन जोशी सध्या ‘सिनिअर सिटीझन’ या चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत. या चित्रपटात त्यांनी एका निवृत्त लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून यात त्यांचे काही ॲक्शन सीन्सही आहेत.
यादृष्टीनेच त्यांचे ॲक्शन शैलीतील काही लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकप्रियदेखील होत आहेत.
यावेळी जोशी म्हणाले की, एखादा लष्कर अधिकारी निवृत्त झाल्यानंतरही त्याची लष्करातील जीवनशैलीच जगत असतो. ही शिस्त त्याच्या नसानसातच भिनलेली असते.
त्यामुळे हा निडरपणा माझ्यात आणण्याचा प्रयत्न केला. मुळात जी भूमिका मी स्वीकारतो, त्या भूमिकेचा मी अभ्यास करतो.
या भूमिकेसाठी कोणते गुण आवश्यक आहेत, ते मी माझ्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो. कारण एक कलाकार म्हणून ते खूप गरजेचे आहे.
या चित्रपटात मोहन जोशी यांच्या व्यतिरिक्त स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या चित्रपटात दिसणार आहेत.
दरम्यान, ‘सिनिअर सिटीझन’ हा चित्रपट येत्या १३डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.