केज येथील नायब तहसीलदार आशा वाघ यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

पुणे, २१ जानेवारी २०२३ : केज (जि. बीड) येथील नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने केजमध्ये या प्रकरणाची चर्चा होत आहे. कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. २०) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.

केज तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली. शुक्रवारी (ता. २०) दुपारी चारच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून, सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नायब तहसीलदार आशा वाघ शुक्रवारी (ता.२०) दुपारी जेवण करून तहसील कार्यालयाकडे मोपेडवरून येत होत्या. त्याचवेळी एका चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडविला. त्यातून उतरलेल्या एका महिलेसह इतर चारजणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बाटलीमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला; मात्र या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या. केज येथील सरकारी रुग्णालयात आशा वाघ यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर यापूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता. कौटुंबिक वादातून त्यांचे बंधू मधुकर वाघ यांनी हल्ला केला होता. जून २०२२ मध्ये मधुकर वाघ यांनी कोयत्याने आशा वाघ यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले होते. या हल्ल्यात नायब तहसीलदार आशा वाघ या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या होत्या; पण आज त्यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झाला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा