जेडीएस नेते शिवानंद पाटील यांचे निधन

20

बंगळुरू, २१ जानेवारी २०२३ कर्नाटकमधील शक्तिशाली नेते आणि जेडीएसचा प्रभावशाली चेहरा शिवानंद पाटील यांचे शुक्रवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. याबाबत पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ज्यांना पक्षाने कर्नाटकच्या आगामी निवडणुकीमध्ये सिंदगी मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले, त्या शिवानंद पाटील यांचे निधन झाले आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस, भाजप आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलरकडून अनेक उमेदवार देखील निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये शिवानंद पाटील यांना देखील उमेदवारी मिळाली होती.

राजकिय कारकीर्द सुरु करण्यापुर्वी शिवानंद हे भारतीय लष्कराचा भाग होते. ते सोळा वर्षे सैन्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.