रत्नागिरी, २९ जानेवारी २०२३ : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाणे शाखेतर्फे गेल्या दोन महिन्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल्स शोधण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे.
या शोधप्रक्रियेत रत्नागिरी पोलिसाांनी एकूण ३७ मोबाईल हँडसेट प्राप्त केले. शनिवारी (ता. २८) पोलिस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या शुभहस्ते तसेच अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी, श्री. सदाशिव वाघमारे, कार्यालय अधीक्षक, पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी याांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेले ३७ मोबाईल हँडसेटपैकी उपस्थित १७ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.
रत्नागिरी पोलिस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की नुकत्याच लोकार्पण झालेल्या सायबर पोलिस ठाणे येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल व तपासाचे काम नियमितरीत्या सुरू करण्यात आलेले आहे. आपल्यासोबत झालेल्या किंवा आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत मोबाईल क्रमांक ८८३०४०४६५० यावर
तत्काळ माहिती द्यावी अथवा सायबर पोलिस ठाणे येथे स्वतः भेट द्यावी.
कोणतीही सापडलेली वस्तू स्वतःकडे ठेवणे ही एक सामाजिक अपप्रवृत्ती असून, यामध्ये सामाजिक प्रबोधनाची आवश्यकता आहे, असे पोलिस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी म्हटले आहे
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे