पेशावर, ३१ जानेवारी २०२३: तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) पाकिस्तानच्या मशिदीवर झालेल्या फिदायन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. या हल्ल्यात आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झालाय. तर १५० हून अधिक लोक जखमी झालेत. या हल्ल्याचा तपशील भयानक आहे. सोमवारी दुपारी १.४० च्या सुमारास पेशावरच्या अत्यंत सुरक्षित भागात एक मशीद लोकांनी खचाखच भरलेली होती. दुपारची नमाज जोहर चालू होती.
नमाज्यांमध्ये केवळ स्थानिक लोकच नव्हते तर पोलिस, लष्कर, बॉम्ब निकामी पथकाचे कर्मचारीही सामील होते. लोक रांगेत नमाज अदा करत होते. तेव्हाच नमाजींमधील पहिल्या रांगेतील एका व्यक्तीने कृत्य केलं आणि एक बधिर करणारा स्फोट झाला. ही व्यक्ती फिदाईन हल्लेखोर होती ज्याचे स्फोटाने तुकडे तुकडे झाले.
हल्लेखोरांना पोलिस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना लक्ष्य करायचं होतं. मृतांमध्ये बहुतांश पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
उमर खालिद खोरासनीशी संबंधित
पाकिस्तानी लष्करानं मारला गेलेला टीटीपी कमांडर उमर खालिद खुरासानीच्या भावानं हा हल्ला आपल्या भावाच्या हत्येचा बदला असल्याचा दावा केलाय. उमर खालिद खुरासानी ऑगस्ट २०२२ मध्ये अफगाणिस्तानमध्ये मारला गेला होता जेव्हा त्याच्या कारला लक्ष्य करण्यात आलं होतं. यामध्ये खोरासानीसह ३ जण ठार झाले.
पेशावरचे एसपी मशिदीत घुसताच झाला स्फोट
पेशावरचे एसपी (तपास) शहजाद कौकब यांनी सांगितलं की, मशिदीत प्रवेश करताच मोठा स्फोट झाला आणि मशिदीचा काही भाग तुटला. देवाच्या कृपेनं या घटनेतून वाचलो, असे ते म्हणाले. शहजाद कौकबचे कार्यालय मशिदीपासून जवळ आहे.
एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, मशिदीचा काही भाग पडला असून काही लोक ढिगाऱ्याखाली असल्याची भीती आहे. पाकिस्तानच्या एजन्सी अजूनही मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. बचाव मोहिमेचे प्रभारी बिलाल फैजी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, “आम्ही सध्या बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं हे आमचं पहिलं प्राधान्य आहे.”
या हल्ल्यात पाकिस्तानची किती मोठी सुरक्षेची चूक आहे. पेशावर पोलीस मुख्यालय स्फोटाच्या ठिकाणाजवळ आहे, दहशतवाद विरोधी विभागाचं कार्यालयही येथे आहे, यावरून याचा अंदाज लावता येतो. याशिवाय फ्रंटियर रिझर्व्ह पोलिस आणि एलिट फोर्स, टेलिकॉम विभागाचं कार्यालयही या मशिदीजवळ आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे