नवी दिल्ली, ३१ जानेवारी २०२३ : श्रीनगर येथे भारत जोडो यात्रेचा काल सांगता समारंभ झाला. या समारंभाला राहुल गांधी यांच्यासह देशातील कॉंग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. यानंतर आज देशाच्या संसदीय अर्थसंकल्पाचा समारंभ होत आहे. दरम्यान, खराब वातावरणामुळे विमानाचे उशिरा उड्डाण झाल्याने राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला कॉंग्रेस नेते उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिली.
आज मंगळवारपासून (ता. ३१) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात होत आहे. यानिमित्त आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून राष्ट्रपती अभिभाषण करणार आहेत. यासाठी श्रीनगर येथून काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि अनेक कॉंग्रेस खासदार दिल्लीतील अधिवेशनासाठी उपस्थित राहणार होते; पण श्रीनगर विमानतळावरून विमानाचे उशिरा उड्डाण झाल्याने अधिवेशनाला पोचायला उशीर होणार असल्याचे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर