मुंबई, ३१ जानेवारी २०२३ : विमानात गैरवर्तनाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. पुन्हा एकदा अबू धाबी ते मुंबई विमान प्रवासात एका परदेशी महिलेने गोंधळ घातल्याची घटना घडली. परदेशी महिलेला बिसनेस क्लासमधील आसनावरून विमानातील क्रू मेंबरने उठवल्याने महिलेने गोंधळ घातला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अबू धाबी येथून रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विमान येत होते. या विमानातून प्रवास करणारी परदेशी महिला इकॉनॉमी क्लासमधील जागेवरून उठून बिझनेस क्लासच्या जागेवर जाऊन बसली. हा प्रकार लक्षात येताच विमानातील कर्मचाऱ्याने तिला विचारणा केली. तिकीट इकॉनॉमी क्लासचे असल्याने बिझनेस क्लासमध्ये बसता येणार नाही, असे या कर्मचाऱ्याने महिला प्रवाशाला सांगितले. हे ऐकल्यावर परदेशी महिलेने कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करण्याबरोबरच ही महिला कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर थुंकली. एवढेच नाही तर विमानात अर्धनग्न फिरत धिंगाणा घातला. इतर प्रवाशांना त्रास होत असल्याने सर्व कर्मचारी तिला शांत राहण्याचे आवाहन करीत होते. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
विमानातील कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून संबंधित आरोपी महिलेविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाओला पेरूचियो (वय ४५) असे आरोपी महिलेचे नाव असून ती इटली येथील रहिवाशी आहे. तिला अटक करण्यात आली. मात्र, त्यानंतर महिलेची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यासोबतच महिलेला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.