लखनऊ, २ फेब्रुवारी २०२३ : लखनऊ तुरुंगात बंद असलेले केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांची आज (गुरुवारी) सुटका करण्यात आली. बुधवारी रात्री कारागृह प्रशासनाला पत्रकार सिद्दीक कप्पनच्या सुटकेचा आदेश प्राप्त झाला होता. ईडी (अंमलबजावणी संचालनालय) मध्ये नोंदणीकृत बेकायदेशीर व्यवहार प्रतिबंध कायदा (यूएपीए) आणि आयटी कायद्यासह सर्व प्रकरणांमध्ये सिद्दीक कप्पनला कोर्टातून जामीन मिळाला आहे.
जिल्हा कारागृह लखनऊचे तुरुंग अधीक्षक आशिष तिवारी यांनी सांगितले की, सिद्दीक कप्पनच्या सुटकेचे आदेश प्राप्त झाले असून, कायदेशीर औपचारिकता पूर्ण करत गुरुवारी सकाळी सिद्दीक कप्पन यांना सोडण्यात आले आहे. ईडीचे विशेष न्यायाधीश संजय शंकर पांडे यांनी कप्पन यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे दोन जामीन आणि तेवढ्याच रकमेच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले होते.
- हाथरस घटनेत झाली होती अटक
केरळमधील मलप्पुरम इथले ते रहिवासी असून, सिद्दीक कप्पन जवळपास २८ महिने तुरुंगात होते. हाथरसमध्ये अशांतता निर्माण करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली पत्रकार सिद्दीक कप्पन यांना ५ ऑक्टोबर २०२० रोजी हाथरसला जात असताना अटक करण्यात आली होती. त्यावेळी तीन जणांसह त्यांना अटक केली होती.
- सिद्दीक कप्पन म्हणाले,
मला पाठिंबा दिल्याबद्दल मी मीडियाचे आभार मानू इच्छितो. माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत. आता बाहेर पडल्याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यावर दिली आहे.
हाथरस येथे ते एका दलित मुलीवरील कथित सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना कव्हर करणार होते. सुरुवातीला शांतता भंग केल्याच्या संशयावरून सिद्दीक कप्पन यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हाथरस सामूहिक बलात्कार-हत्येच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर आणि त्याच्यासोबत गाडीत असलेले लोक जातीय दंगली भडकवण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.