हैदराबाद , ३ फेब्रुवारी २०२३ :तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध, दिग्गज व ज्येष्ठ दिग्दर्शक काशिनाथुनी विश्वनाथ यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोकांतिका पसरली आहे. विश्वनाथ यांनी सुमारे ५ दशके तेलुगू चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना हैदराबादच्या ज्युबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा आधीच मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
के. विश्वनाथ यांचे मूळ गाव बापटलाच्या रायपल्ले जिल्ह्यातील पेडा पुलिवरू हे असून, त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९३० रोजी झाला. त्यांनी गुंटूर हिंदू कॉलेजमधून इंटरमिजिएट आणि आंध्र ख्रिश्चन कॉलेजमधून बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील चेन्नईतील विजयवाहिनी स्टुडिओत काम करायचे. पदवी पूर्ण केल्यानंतर विश्वनाथ यांनी त्याच स्टुडिओमध्ये साउंड रेकॉर्डिस्ट म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी पातालभैरवी या चित्रपटासाठी सहाय्यक रेकॉर्डिस्ट म्हणून काम केले. १९६५ मध्ये त्यांना ‘आत्मगरवम्’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी नंदी पुरस्कार मिळाला होता.
विश्वनाथ यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीत ५० हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी टॉलिवूडसह बॉलीवूडमध्ये देखील ९ चित्रपट दिग्दर्शित केले. तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी तेलुगू सिनेसृष्टीला सागरा संगम, स्वाथिमुथ्यम, सिरीसिरिमुव्वा, श्रुतिलयालू, सिरिवेनेला, अपदबांधवुडू, शंकरभरणम असे अनेक दर्जेदार चित्रपट दिलेत. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.
- दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित :
चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. १९९२ मध्ये त्यांना रघुपती व्यंकय्या पुरस्कार आणि त्याच वर्षी पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला होता. विश्वनाथच्या चित्रपटांपैकी स्वाथिमुट्यम हा अत्यंत प्रसिद्ध चित्रपट आहे जो ऑस्करच्या शर्यतीत देखील सामिल होता. के. विश्वनाथ यांचे स्वाथिमुथ्यम, सागरसंगम आणि सिरिवेनेला हे चित्रपट आशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हल आणि मॉस्को चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.