मुंबई, ५ फेब्रुवारी २०२३ :वेगवेगळ्या वादामुळे कायम चर्चेत राहणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. विनोद कांबळीच्या विरोधात त्याची पत्नी अँड्रिया हेविटने मारहाणीचा आरोप केला आहे. या प्रकरणी अँड्रियाने वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी याने मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाक घरातील पॅनचे हँडल तिच्यावर फेकले, त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान घडली. जेव्हा कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्याच्या वांद्रे फ्लॅटवर पोहोचले आणि त्याने त्याच्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानुसार, IPC ३२४ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनोदला अद्याप अटक केलेली नाही.
- असे आहे कांबळीचे करिअर
विनोद कांबळी हा भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा खूप चांगला मित्र आहे. विनोद कांबळी याने भारतासाठी १७ कसोटी सामने खेळले असून, १,०८४ धावा केल्या आहेत. तर १०४ वन डे सामन्यात २,४७७ धावा केल्या आहेत. यामध्ये एकूण सहा शतकांचा समावेश आहे. १९९१ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणारा विनोद कांबळी केवळ सहा वर्षेच क्रिकेट खेळला. २००० मध्ये तो शेवटचा सामना खेळला होता. तर सचिन तेंडुलकर २०२४ पर्यंत क्रिकेट खेळला असून, अनेक विक्रम आपल्या नावे केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.