आता ट्रेनमध्ये व्हॉट्सॲपद्वारे मागवता येणार प्रवाशांना ऑनलाइन जेवण

नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी २०२३ : भारतीय रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आता तुम्ही पीएनआर नंबराचा वापर करून, ट्रेनमध्ये प्रवास करतानाही, तुमच्या सीटवर बसून व्हॉट्सॲपद्वारे ऑनलाइन जेवण ऑर्डर करता येणार आहे. एका निवेदनात, रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, रेल्वेने आपल्या ई-कॅटरिंग सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी भारतीय रेल्वेने व्हॉट्सॲप चा उपयोग करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यासाठी ९१-८७५०००१३२३ हा नंबर जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेचे कॅटरिंग सर्व्हिस आणि टुरिझम आयआरसीटीसीने (IRCTC) प्रवाशांना ही अधिक सुविधा दिली आहे. त्यामुळे जेवण ऑर्डर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. आता प्रवासी आपल्या सीटवर बसून जेवण ऑर्डर करू शकतील. तुम्हाला फक्त विचार करायचा आहे की, तुम्हाला काय खायचे आहे आणि गरम जेवण तुमच्या सीटवर पोहोचवले जाईल. दरम्यान, या सुविधेसाठी आयआरसीटीसीची फूड डिलिव्हरी सर्व्हिस Zoop ने Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे. यामुळे प्रवाशांना व्हॉट्सॲपवर चॅटबॉट सर्व्हिसची सुविधा मिळणार आहे.

व्हॉट्सॲपवरून जेवण ऑर्डर करण्यासाठी प्रवाशांना फक्त पीएनआर नंबर लागणार आहे. प्रवासी पीएनआर नंबरद्वारे आपले जेवण सहजपणे ऑर्डर करू शकतील. खास गोष्ट म्हणजे जेवण ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही ॲपची गरज भासणार नाही. म्हणजेच तुम्हाला कोणतेही अतिरिक्त ॲप डाउनलोड करावे लागणार नाही.

दरम्यान, फूड ऑर्डर केल्यानंतर तुम्ही चॅटबॉट म्हणजेच व्हर्च्युअल रोबोटद्वारे रिअल टाइम फूड ट्रॅकिंग करू शकाल. याशिवाय चॅटबॉटद्वारे फीडबॅक आणि ऑर्डरशी संबंधित सपोर्टची सुविधाही तुम्हाला मिळणार आबे. ट्रेनमधील प्रवासी यूपीआय (UPI) पेमेंट किंवा नेटबँकिंगद्वारे किंवा रोखीने पैसे भरण्यास सक्षम असतील.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा