पुणे, ११ फेब्रुवारी २०२३ : अश्विन एका बाजूला, तर जडेजा दुसरीकडे. नागपुरात दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाचे वाद्य वाजविले. त्यामुळे भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या ९१ धावांत आटोपला. भारताने हा सामना एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला. यासह भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
नागपूर कसोटीत भारताने अवघ्या तीन दिवसांत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली; पण त्यांचा पहिला डाव अवघ्या १७७ धावांवर संपुष्टात आला. भारतासाठी पहिल्या डावात रवींद्र जडेजा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५ फलंदाजांना बाद केले. यानंतर भारताने पहिल्या डावात ४०० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ७ विकेट घेणारा टॉड मर्फी हा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरवातही पहिल्या डावाप्रमाणेच झाली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने पुन्हा एकदा निराशा केली आणि सलग दुसऱ्या डावात सिंगल डिजिटवर बाद झाला. अश्विनने ख्वाजाची विकेट घेतली. यानंतर जडेजाने येऊन जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा कसोटी फलंदाज मार्नस लबुशेनला चालायला लावले. लबुशेन १७ धावा करून बाद झाला. यानंतर अश्विनने एकापाठोपाठ एक ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद केले ज्यातून सावरणे कांगारू संघासाठी सोपे नव्हते आणि ते ९१ धावांवर बाद झाले.
अश्विन भारताकडून सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने दुसऱ्या डावात ५ फलंदाज बाद केले. घरच्या मैदानावर अश्विनची ही ५ वी विकेट होती. त्याच्या कारकिर्दीतील ही ३१वी वेळ होती, जेव्हा त्याने ५ विकेट घेतल्या. अश्विनशिवाय शमी आणि जडेजाने प्रत्येकी दोन, तर अक्षर पटेलला १ विकेट मिळाली. नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या ९१ धावा ही भारताविरुद्धची कसोटीतील दुसरी सर्वांत कमी धावसंख्या होती. यापूर्वीचा १९ वर्षे जुना विक्रम मोडीत निघाला आहे. १९ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ९३ धावांत ऑलआऊट झाला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड