मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; कोकण रेल्वेचा खोळंबा, प्रवासी त्रस्त

रत्नागिरी, १२ फेब्रुवारी २०२३ : कोकण रेल्वेमार्गावर आज खेड तालुक्यातील कळंबणी ते दिवाणखवटी या स्थानकांदरम्यान नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेनंतर दुसरे इंजिन जोडून दुपारी एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक आज विस्कळित झाली. आज सकाळी केरळ राज्यातील एरनाकुलम ते नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन या स्थानकादरम्यान धावणारी (१२६१७) या मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने खेड तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वेस्थानकाजवळ सुमारे दोन तास गाडी थांबली होती.

रविवार असल्यामुळे मुंबईतून गावी व गावातून मुंबईत जाणाऱ्या दोन्ही बाजूंकडील प्रवाशांची गर्दी सर्वच रेल्वेस्थानकांवर झाली होती. दुसरे इंजिन जोडून दुपारी मंगला एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्यानंतर कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा