पिंपरी-चिंचवड, १४ फेब्रुवारी २०२३ : आपले घर, परिवार सुरक्षित राहावा, यासाठी सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक तैनात केले जातात. त्यासाठी दरमहा पैसे मोजले जातात; मात्र अलीकडे हेच सुरक्षारक्षक सोसायटीत चोऱ्या, अल्पवयीन मुलींसह महिलांचे विनयभंग यांसारखे प्रकार करू लागले आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी सोसायटीने कंत्राट दिलेल्या सुरक्षा एजन्सीमध्ये खात्रीलायक; तसेच पोलिस पडताळणी करणे आवश्यक आहे.
निगडी येथे एका सोसायटीत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाने कोट्यवधींचा ऐवज घेऊन पोबारा केला होता; तसेच कंपनीतील एका अधिकाऱ्यासोबत मिळून सुरक्षारक्षकाने पाच लॅपटॉपचा अपहार केल्याचा प्रकारही निगडी येथे उघडकीस आला आहे. एमआयडीसी भोसरी परिसरात सुरक्षारक्षकाने दीड लाखाचे साहित्य चोरून नेल्याची नोंद आहे.
शहरातील किती सुरक्षारक्षकांची पोलिस पडताळणी झाली आहे, याबाबत पोलिसांनी देखील एक स्पेशल ड्राईव्ह घेण्याची गरज आहे. ज्यामुळे एजन्सी मालक देखील खडबडून जागे होतील. शहरात मागील वर्षभरात केवळ आठ हजार १५३ सुरक्षकांनी पोलिस पडताळणी केल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक सुरक्षारक्षक शहरात तैनात आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर