कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथे दोन सिरॅमिक दुकानांना लागली आग; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

कोल्हापूर, १८ फेब्रुवारी २०२३: पुलाची शिरोली येथे कोल्हापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गालगत मार्बल लाईन टोलनाक्याजवळील इंगळे सिरॅमिक सेंटरला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. दुकांनामध्ये प्लयवूड, रबरी मॅट असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग विझविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण केले.

अग्निशमन बंब येईपर्यंत इंगळे सिरॅमिक सेंटर जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर या दुकानालगत चंदवाणी सिरॅमिक दुकान आहे. इंगळे सिरॅमिक सेंटरला लागलेल्या आगीने चंदवाणी सिरॅमिक सेंटरच्या वातानुकूलित मशीनला आग लागून त्याची वायर जळत ती चंदवाणी सिरॅमिकमध्ये घुसली. अग्निशमन दलाचा बंब एकच असल्याने सुरवातीला आग आटोक्यात आणणे कठीण बनले होते. त्यानंतर अन्य अग्निशमन दलाच्या बंबांनाही पाचारण करण्यात आले. तोपर्यंत चंदवाणी सिरॅमिक दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर अतिमहागडे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तिन्ही बाजूंनी बंब उभे करून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जवळपास तीन तास आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीमध्ये दोन्ही दुकानांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा