निगडी, १९ फेब्रुवारी २०२३ : संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समिती आयोजित ‘स्मृतिरंग ७५’ गेले २१ आठवडे उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू आहे. ज्येष्ठ साहित्यिका, एस. एल. भैरप्पा यांच्या आणि इतर कन्नड साहित्याच्या प्रसिद्ध अनुवादक व अभ्यासक, उत्तम चित्रकार असलेल्या डॉ. उमाताई कुलकर्णी यांनी नुकतीच पु. ना. गाडगीळ अँड सन्स, चिंचवड येथील कलादालनात प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. नयना कासखेडीकर (संस्कार भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार-प्रसिद्धी संयोजक, अखिल भारतीय साहित्य विधा समिती सदस्या), सुषमाताई हिरेकेरूर (सहसंयोजिका, साहित्यविधा पश्चिम प्रांत), श्री. सचिन काळभोर (अध्यक्ष, संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड समिती), सौ. लीना आढाव (सचिव, संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड समिती); तसेच श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर (उपाध्यक्ष तथा प्रकल्पप्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. उमाताई कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, ज्येष्ठ चित्रकार रामा घारे, सौ. लीना आढाव यांच्या चित्रातली विविधता, रंगसंगती, निवडलेले विषय, कलाकृती करीत असताना वापरलेली विविधता यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
सदर स्मृतिरंग प्रदर्शनाचा आज रविवारी (ता. १९) अंतिम दिवस असून, आज सायंकाळी सौ. मुग्धा शिरोडकर यांचे भारतीय अलंकारिक चित्रशैलीचे प्रात्यक्षिक होणार आहे. तरी सर्व कलारसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील