नवी दिल्ली : आज काल समाजामध्ये आपला स्वार्थ साधण्यासाठी नागरिक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. शिवाय नात्यांचाही विचार केला जात नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे. चीनमध्ये सरकारी योजनेचा फायदा मिळवण्यासाठी एकाच कुटुंबातील ११ सदस्यांनी दोन आठवड्यात एकमेकांशीच तब्बल २३ वेळा लग्न केले आणि शिवाय त्यांनी लगेच घटस्फोटही घेतला.
याबाबत CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, झेजियांग प्रांतातील लिशुई शहरातील एका छोट्या गावात शहरी नूतनीकरण भरपाई योजना सुरू करण्यात आली. याची माहिती पैन नावाच्या एका व्यक्तिला सनजते. या योजनेअंतर्गत सरकारकडून स्थानिक नागरिकांना कमीत कमी ४३० फूटाचे अपार्टमेन्ट देण्याची सुविधा देण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांनाही ही घरे मिळणार होती. पैनने या सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी पूर्व पत्नीशी दुसऱ्यांदा लग्न केले. अवघ्या सहा दिवसात पैनला जमीन मिळाली. जमीन मिळाल्यानंतर त्याने पूर्व पत्नीला पुन्हा घटस्फोट दिला. यानंतर याच कुटुंबातील इतर सदस्यही या घोटाळ्यात सामील झाले.
पैनने जमिनीच्या लालसेपोटी सख्खी बहीण, मेहुणीशी लग्न केले. याचदरम्यान पैनच्या वडिलांनी इतर नातेवाईकांशी लग्न केले. या लग्न घोटाळ्यात त्याची आई देखील सहभागी होती. एकमेकांशी लग्न केल्यानंतर त्यांनी गावातील नागरिक म्हणून नोंदणी केली आणि नंतर घटस्फोट घेतला. पैनने एका आठवड्यात तीनदा लग्न केले आणि लग्नाची नोंदणी केली.
दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांना पैनच्या या घोटाळ्याबद्दल कळलं. शोध घेतल्यावर त्यांना दिसलं की, ११ लोकांच्या घरचा पत्ता एकच आहे. घोटाळ्याचा खुलासा झाल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली. यानंतर काही सदस्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.